बिऱ्हाड

उगवत्या सुर्याची कोवळी किरणं
आणि रस्त्याच्या कडेला थाटलेला
संसार!
आता हातावरच्या पोटाला
बिनबुडाचे दिवस आले
होते नव्हते सारेच गेले
जगूनही मरणेच सोईचे झाले
तिथेच दोन झाडाच्या बुंध्याला
दोरीने बांधलेला पाळणा त्यांचा
मला आजही नजरेसमोर
हलताना दिसतो
झुलताना दिसतो
कुठला आला पंखा
झाडांच्या सावलीतच तो
जीव विसावतो
टेडी बिअरसाठी
कधी काळी इथे दुकानासमोर
किती गर्दी व्हायची
आता नामशेष झालेल्या गर्दीतून
ढुंकून माणसंही बघत नाहीत
अधन उकळत्या पाण्यात बघून
तिला प्रश्न पडतो
काय शिजवायचं
पोटाची खळगी भागवायची तरी कशी
म्हणून
तारेवरची कसरत चालते
कामाची तशी सोय राहिली नाही
डोळ्या खाली पडलेली
काळी वर्तुळे , अन् तिचा तो
सुकलेला चेहरा बघून
आधीची गिऱ्हाईकाला हसत हसत
टेडी दाखवणारी ती आठवते
मला मात्र ते टेडी दुरूनच आकर्षित करायचे
पण किंमत बघून मी घ्यायची कधी हिंमत
केली नाही
भावबाजी करणारे तै
आणि तिचा अट्टाहास पेटलेला
ती म्हणेल तेवढ्याच दामात विकायची
वस्तू ठेवून कुणाला माघारी पाठवताना
येईल दुसरे म्हणून तिला विश्वास असायचा
आता भाव ठरवायचा ही
हव्यास तिच्यात उरला नसावा
मातीला कोरड पडते
आज दुष्काळ मात्र मनाचा झाला
फाटलेल्या संसाराला
ठिंगळ लावता लावता
जन्म जातो आमचा
बसलेल्या ह्या जिंदगीला
उजाडू नको म्हणून
भाकरीच्या तुकड्यासाठी
तिळ तिळ तुटतो थकलेला देह हा
कुठे एसीची हवा
कुठे आलिशान मागण्या
गरिबीचे राजकारणही होऊ नये
इतकेच माफक सांगणे
सरकार नावाच्या आणि अनेक
राजकीय पक्षाला

दोस्तहो!

होईल का शांत

भुकेसाठी उफाळून आलेलं हे युद्ध??